अबुधाबी - चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे तेराव्या मोसमातील संघाच्या दुसर्या सामन्यातून बाहेर पडला आहे. ब्राव्हो दुखापतीमुळे गतविजेते मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लीगच्या उद्घाटन सामन्यात खेळू शकला नाही. चेन्नईने हा सामना पाच गड्यांनी जिंकला.
एका वृत्तानुसार, कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) दरम्यान ब्राव्होला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. दुखापतीमुळे ब्राव्हो पुढच्या सामन्यात खेळू शकणार नाही, असे चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य प्रशिक्षक स्टीव्हन फ्लेमिंगने म्हटले आहे.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने ब्राव्होच्या जागी सॅम करनला संघात स्थान दिले. त्याने या संधीचा पुरेपुर फायदा उठवत पहिल्या सामन्यात ६ चेंडूंत १६ धावा चोपल्या. याशिवाय, त्याने गोलंदाजीत २८ धावा देत १ बळी घेतला.
फ्लेमिंग म्हणाला, ''ब्राव्हो दुखापतग्रस्त होता, त्यामुळे तो पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी सॅम करनला स्थान देण्यात आले आहे.'' चेन्नई सुपर किंग्ज आता आपला पुढील सामना २२ सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध शारजाहमध्ये खेळणार आहे.