दुबई - आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सन यांच्यात लढत होत आहे. गतविजेत्या मुंबईला सामोरे जाण्यासाठी बंगळुरू सज्ज झाला असला तरी, त्यांच्यासमोर कामगिरीतील सातत्य हे मोठं आव्हान असणार आहे.
बंगळुरुने यंदाच्या आयपीएलचा दिमाखदार प्रारंभ केला. पण दुसऱ्या सामन्यात ते किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध तब्बल ९७ धावांनी पराभूत झाले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचे वेगवान गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. मागील दोन सामन्यात कर्णधार विराट कोहलीला अपेक्षित कामगिरी नोंदवला आली नाही. तो अनुक्रमे १४ आणि १ धावांवर बाद झाला. यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अॅरोन फिंचकडूनही सामना जिंकून देणाऱ्या खेळींची अपेक्षा आहे.
आरसीबीसाठी समाधानाची बाब म्हणजे, एबी डिव्हिलियर्स सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. परंतु तो मोक्याच्या क्षणी चूकीचा फटका मारत बाद होताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे अष्टपैलू ख्रिस मॉरिस खेळू शकला नाही. तो आज खेळण्याची शक्यता आहे. बंगळुरुच्या गोलंदाजीची भिस्त युजर्वेद्र चहलवर आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, डेल स्टेन आणि आणि उमेश यादव महागडे ठरत आहेत. त्यांना आपली लय पकडावी लागणार आहे. आजच्या सामन्यात उमेश यादव ऐवजी मोहम्मद सिराजचा पर्याय आरसीबी विचारात घेऊ शकते. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीसुद्धा संधीच्या प्रतिक्षेत आहे.
दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या लढतीतील पराभवानंतर शानदार पुनरागमन केले. संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवला. आजच्या सामन्यात संघात अंतिम ११ मध्ये एक बदल होऊ शकतो तो म्हणजे सौरव तिवारीच्या स्थानी ईशान किशनला संधी मिळू शकते.
रोहित शर्माला सूर गवसल्याने मुंबईची मुख्य चिंता मिटली आहे. याशिवाय केकेआरविरुद्ध सूर्यकुमार यादवनेही अप्रतिम फलंदाजी केली. आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांडय़ा आणि केरॉन पोलार्ड यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन आणि ट्रेंट बोल्ट चांगली कामगिरी करत आहेत.