अबुधाबी - रॉयल चॅलेंजर बंगळुरूने बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सचा ८ गडी राखत दारुण पराभव केला. कोलकाताच्या पराभवानंतर त्याचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम चांगलाच नाराज झाला आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपली नाराजी बोलून दाखवली.
मॅक्युलम म्हणाला, अबुधाबीची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती, असे मला वाटले नाही. पण सिराज आणि ख्रिस मॉरिस यांनी चांगला मारा केला. त्याचे कौतुक तर आहेच, परंतु आमचे फलंदाज एक-दोन विकेट गेल्यानंतर थोडेसे घाबरलेले दिसले. यामुळे मी खूप निराश झालो.
बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांनी सकारात्मक राहून खेळणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. यापुढील सामन्यांआधी आम्हाला या गोष्टीवर काम करावे लागणार आहे. आघाडीच्या फळीतल्या आमच्या एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही, असेही मॅक्युलम म्हणाला.
अबुधाबीच्या मैदानावर बंगळुरूने कोलकातावर ८ गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले आवश्यक असलेल्या ८५ धावांचे आव्हान बंगळुरूने सहज पूर्ण केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताचा डाव बंगळुरूच्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत कोलकाताची दाणादाण उडवली. यानंतर बंगलुरूने विजायासाठीचे आव्हान १४व्या षटकात पूर्ण केले.
हेही वाचा - SRH vs RR : हैदराबादला जबर धक्का; हुकमी एक्काच झाला पुन्हा दुखापतग्रस्त
हेही वाचा - RCB vs KKR : बरे झाले, आम्ही नाणेफेक गमवली; कर्णधार विराटची सामन्यानंतर प्रतिक्रिया