दुबई - आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाचा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्रा आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर पडला आहे. शारजाहमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध खेळताना मिश्राला दुखापत झाली होती.
''अमित मिश्राच्या बोटाच्या दुखापतीला अहवाल अजून आलेला नाही. मिश्राच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. मिश्रा चांगल्या फॉर्मात असून संघ त्याच्यासोबत जोखीम घेण्याचा अजिबात विचारात नाही'', असे संघाने सागितले.
अमित मिश्राच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही वर्षात लेगस्पिनरविरूद्ध संघर्ष करताना दिसला होता. या मोसमातही विराट कोहली मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहरचा बळी ठरला आहे. अमित मिश्राच्या जागी अक्षर पटेलला संघात संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी आत्तापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या ते गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहेत. तर, बंगळरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघातील हा पाचवा सामना असून दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यास प्रयत्नशील असतील.