नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान वॉर्नर चाहत्यांसाठी सतत व्हिडिओ-फोटो शेअर करत असतो. आता तो 'ग्रॅविटी' व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
33 वर्षीय वॉर्नरने हा टिकटॉक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हवेत उडत चिप्स खात असल्याचे दिसून येत आहे. ''चिप्स खात असल्यामुळे एक आळशी रविवार'', असे वॉर्नरने कॅप्शनमध्ये म्हटले.
लॉकडाऊनमध्ये वॉर्नरने अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांनाही त्याला खूप प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तो पत्नी कँडिससोबत तेलगू फिल्मस्टार महेश बाबू यांच्या गाण्यावर नाचताना दिसला होता.
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटच्या अनेक स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू आपल्या घरी वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.