नवी दिल्ली - विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने आयपीएलमध्ये वर्णद्वेषी वागणूक मिळाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना त्याला आणि त्याचा सनरायझर्स हैदराबादचा साथीदार थिसारा परेरा यांना वर्णद्वेषी अपमानाचा सामना करावा लागला होता. याबद्दल सॅमीने इन्स्टाग्रामवर आपला राग व्यक्त केला आहे.
सॅमी म्हणाला, ''मला आता कालूचा अर्थ कळला. जेव्हा मी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळायचो तेव्हा मला आणि परेराला कालू म्हटले जायचे. मला वाटले की याचा अर्थ घोडा आहे. पण हे जाणून मला खूप राग आला."
आफ्रिकन वंशाचा अमेरिकेचा नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस अत्याचारामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद होऊ लागला आहे. वेस्ट इंडीजचे खेळाडू ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमी यांच्यासह अनेक खेळाडूंनी देखील वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. सॅमीने तर आयसीसीला कृष्णवर्णीय खेळाडूंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
सॅमीने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले होते, ''कृष्णवर्णीयांना केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो. माझ्यासारख्या लोकांचे काय होत आहे हे आयसीसी आणि इतर सर्व बोर्डांना का दिसत नाही? आता गप्प बसण्याची वेळ नाही. मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. कृष्णवर्णीय लोक बर्याच काळापासून सहन करत आले आहेत. मी सेंट लुसियात आहे आणि जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूमुळे मी दु: खी आहे. आपण ह्या गोष्टींमध्ये बदल आणण्यासाठी मदत करणार का?''