पोर्ट व्हिला - कोरोना व्हायरसचा परिणाम संपूर्ण जगावर झाला असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. क्रिकेटच्या अनेक स्पर्धा स्थगित झाल्या असल्या तरी, एका देशात क्रिकेट मोठ्या उत्साहाने खेळले जात आहे. कोरोनाच्या संकटातही प्रशांत महासागरस्थित वानुआटु हा क्रिकेटच्या स्पर्धा खेळवला जाणारा पहिला देश ठरला आहे.
वानुआटुच्या घरगुती स्पर्धेतील महिला सुपर टी-२० लीगचा सामना सुरू झाला. हा सामना वानुआटु क्रिकेटच्या फेसबुक पेजवर थेट प्रसारित झाला होता. चार संघांमध्ये झालेल्या स्पर्धेत पॉवर हाऊस शार्कने टॅफी ब्लॅकबर्डचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात शार्कचा सामना मेल बुल्सशी झाला. अंतिम सामन्यात मेल बुल्सने पॉवर हाऊस शार्क्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. महिलांच्या सामन्याआधीच पुरुष प्रदर्शन सामनाही खेळला गेला.
वानुआटु येथे ४० षटकांच्या क्लब स्पर्धेची सुरुवात २ मे रोजी होणार असून या स्पर्धेत सात संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत.
आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत वानुआटु हा २८व्या क्रमांकाचा संघ आहे आणि पुरुष संघ ५० व्या स्थानावर आहे. वानुआटुमध्ये कोरोनाव्हायरसचा एकही रूग्ण सापडलेला नाही.