कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) पुढील वर्षी इंग्लंडविरूद्ध एक कसोटी सामन्याच्या आयोजनाची इच्छा व्यक्त केली आहे. कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या रद्द झालेल्या एकदिवसीय सामन्याच्या भरपाईसाठी कॅब आपला प्रस्ताव बीसीसीआयकडे सादर करेल, असे कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया म्हणाले आहेत. १५ मार्चला लखनऊ आणि १८ मार्चला कोलकाता येथे भारत आणि आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामने होणार होते. मात्र, कोरोनाच्या उद्रेकामुळे ते रद्द करावे लागले.
दालमिया म्हणाले, "इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका अशाप्रकारे आखण्याची आम्ही बीसीसीआयला विनंती करू, जेणेकरुन या दोन रद्द सामन्यांच्या भरपाईची संधी दोन्ही असोसिएशनला मिळेल. बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली पाहिजे. कारण त्यांचा संघ २०२१ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येईल. ही आमची पुढील घरची मालिका असेल.'' जानेवारी ते मार्चदरम्यान इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर येणार आहे.
इंग्लंडचा तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० मालिकेसाठीचा दौरा यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार होता. परंतु, कोरोनाच्या साथीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला.
याआधी, श्रीलंका क्रिकेट मंडळाने कोरोनाच्या परिस्थितीमुळे आवश्यक असल्यास इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतातील कोरोनाव्हायरसचे वाढते प्रकरण लक्षात घेता पुढच्या वर्षी इंग्लंडच्या कसोटी दौर्याबाबत शंका उपस्थित होत आहेत.