नवी दिल्ली - भारताचा यशस्वी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमधील काउंटी अजिंक्यपद स्पर्धेत ग्लॉस्टरशायर संघाकडून खेळणार आहे. या चॅम्पियनशिपच्या पहिल्या सहा सामन्यांसाठी पुजारा संघाचे प्रतिनिधित्व करेल.
हेही वाचा - "सेहवागला पाकिस्ताननं मोठं केलं", रझाकचं नवीन वक्तव्य
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुजारा सध्या सातव्या स्थानावर आहे. 'या हंगामात ग्लॉस्टरशायरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. क्लबचा इतिहास मोठा आहे आणि त्यात भाग घेण्याची आणि यशस्वी होण्यासाठी योगदान देण्याची ही उत्तम संधी आहे', असे पुजाराने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
"मी गेल्या काही वर्षांत काउंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव घेतला आहे आणि माझा खेळ सुधारल्यामुळे मी या गोष्टीवर आणखी काम करेन', असेही तो म्हणाला. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पुजाराने पदार्पण केले होते.
२०१२ मध्ये त्याने हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतक केले होते. पुजारा यापूर्वी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डर्बशायर, यॉर्कशायर आणि नॉटिंगहॅमशायरकडून इंग्लंडमध्ये खेळला आहे.