नवी दिल्ली - भारताच्या कसोटी संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराची तुलना दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविडशी केली जाते. कसोटी सामन्यात तळ ठोकून बसणारे फलंदाज म्हणून पुजारा आणि द्रविडची विशेष ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्याविषयी द्रविडने केलेले सहकार्य पुजाराने आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे.
एका मुलाखतीत पुजारा म्हणाला, "मी द्रविडकडे खूप आकर्षित झालो. तरीही मी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. आमच्या खेळांमध्ये समानता आहेत. सौराष्ट्र संघात खेळताना मला कळले, की फक्त शतक ठोकणे संघाला जिंकण्यासाठी पुरेसे नसते.''
तो म्हणाला, "द्रविडच्या प्रभावामुळे माझी विचारसरणी बदलली आहे. राहुल द्रविड माझ्यासाठी कोण आहे हे मी तुम्हाला एका ओळीत सांगू शकत नाही. तो नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिला आहे."
क्रिकेटबाहेरच्या आयुष्यावरही पुजाराने आपले मत दिले. तो म्हणाला, "द्रविडने मला क्रिकेटमधून बाहेर पडण्याचे महत्त्व देखील सांगितले. मी नेहमीच एका गोष्टीबद्दल विचार करत राहिलो, पण जेव्हा मी त्याच्याशी बोललो तेव्हा मला आवश्यक गोष्टी समजल्या. द्रविड व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य कसे वेगळे ठेवतो हे मी काऊंटी क्रिकेटमध्ये पाहिले. मी त्याचा सल्ला ऐकला.''
चेतेश्वर पुजाराने भारतासाठी 77 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 48.67 च्या सरासरीने 5840 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 18 शतके आणि 25 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने भारताकडून तीन दुहेरी शतकेही केली आहेत.