मँचेस्टर - पहिल्या ४५ मिनिटात केलेल्या खराब खेळामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहली याने सामना संपल्यानंतर दिली. विश्वकरंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला न्यूझीलंडने १८ धावांनी पराभूत केले. भारताच्या या पराभवाबरोबरच विश्वकरंडकाचे स्वप्न भंगले आहे.
न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्याने आम्ही कुठे चुकलो याचे स्पष्टीकरण दिले. न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांचे आव्हान आम्ही पूर्ण करु, असा आमचा विश्वास होता. मात्र, न्यूझीलंडने पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी करत आम्हाला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे पहिल्या ४५ मिनिटातच आम्ही सामना गमावला, असे विराट म्हणाला.
विराटने सामन्यात चुकीचा फटका मारुन बाद झालेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याचा बचाव करत सांगितले की, पंत आणि पांड्याने चांगला खेळ केला. मात्र, त्यांच्या फटक्याची निवड चुकली आणि ते मोक्याच्या क्षणी बाद झाले. अशा चुका माझ्याकडूनही झाले असल्याचे तो म्हणाला.