दुबई - भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटने घाम फोडणारा ब्रायन लारा याची क्रिकेट जगतात सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याने नुकतेच त्याच्या बालपणी घडलेल्या घटना क्रिकेटप्रेमीबरोबर शेअर केल्या आहेत. तो चार वर्षाचा होता तेव्हा नारळाच्या फांदीपासून बनविलेल्या बॅटने फलंदाजी करायचा. जी बॅट पेंटिग करणाऱ्या ब्रश सारखी असयाची.
लारा म्हणाला, की माझ्या भावाने नारळाच्या झाडाच्या फांदीपासून बॅट तयार करुन दिली होती. आपल्याला माहितच आहे की, विंडीज हा उष्णकटिबंधीय क्षेत्रात मोडणारा भाग आहे. येथे नारळाची झाडे अनेक आहेत. माझ्या मित्रासोबत मी माझ्या हातात जे येईल त्याने मी क्रिकेट खेळायचो.
पुढे बोलताना लारा म्हणाला, की मी गली क्रिकेटवर विश्वास ठेवतो. मी साऱ्या प्रकारचे खेळ खेळायचो. पावसाळ्याच्या वेळी फुटबॉल खेळायचो. मी टेबल टेनिसही खेळलो. पण माझे अस्सल प्रेम क्रिकेटवर होते. माझ्या वडिलांचाही हाच विचार होता की मी फुटबॉलपेक्षा क्रिकेटच खेळावे.
लारा वडिलांच्या आठवणी सांगताना म्हणाला, की माझ्या वडिलांना क्रिकेट खूप आवडायचे. आमच्या गावात एक क्रिकेटची लीग ते चालवायचे. क्रिकेटमध्ये मी यशस्वी होण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी सहज उपलब्ध करुन दिल्याचे लाराने सांगितले.