मुंबई - भारतीय सलामीवीर रोहित शर्माने मैदानावर सामना करण्यासाठी कठीण असलेल्या या दोन गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनविरूद्ध खेळताना त्रास होत असल्याचे रोहितने स्पष्ट केले.
रोहित क्रिकेट कनेक्ट इव्हेंटमध्ये म्हणाला, “ब्रेट ली हा एक गोलंदाज आहे ज्याने २००७ मध्ये पहिल्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर मला रात्री झोपू दिले नाही. मी त्याला कसे खेळायचे याबद्दल रात्रभर विचार करत होतो. तो ताशी १५० किलोमीटर वेगाने चेंडू टाकायचा. २००७ मध्ये ब्रेट ली त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्मात होता.”
रोहित पुढे म्हणाला, “माझे दोन आवडते गोलंदाज आहेत ज्यांचा मला कधीही सामना करावासा वाटला नाही. त्यातील एक ब्रेट ली आणि दुसरा डेल स्टेन होता. वेग आणि स्विंगमुळे मला स्टेनचा कधीही सामना करावासा वाटला नाही.”
रोहितने सध्याच्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुडचे नाव घेत सांगितले, की खूप शिस्तबद्ध गोलंदाजी करत असल्यामुळे त्याला खेळणे खूप अवघड आहे.