नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटमध्ये लाळेच्या वापरावर बंदी घालण्याच्या विचारात आहे. याप्रकरणी अनेक क्रीडापंडितांनी मते दिली. मात्र, आता भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेट ली म्हणाला, 'हा एक कठीण निर्णय आहे. ही अशी गोष्ट आहे जी आपण नेहमी केली. वयाच्या आठ-नऊ वर्षापासून आम्हाला चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरायला सांगितले जात होते. म्हणूनच, अचानक तुम्हाला काही वेगळे सांगितले गेले तर तुम्ही ते करू शकत नाही.'
तो म्हणाला, 'पुढच्या काळात गोलंदाजांना हे खूप कठीण जाईल. संतुलित खेळ खेळण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांना समान मदत झाली पाहिजे. वेगवान गोलंदाजांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे.'
यावर सचिनने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'कसोटी डावात 50 षटकांनंतर आयसीसी आणखी एक नवीन चेंडू वापरण्याचा विचार करू शकेल. सध्या 80 षटकांनंतर चेंडू बदलला जातो. थंड हवामानात जेव्हा खेळाडूंना जास्त घाम येत नाही. तेव्हा चेंडू चमकवणे अधिक कठीण होते आणि हे गोलंदाजांना अधिक हानिकारक ठरू शकते. चेंडूला चमकवण्यासाठी लाळ नसेल तर, प्रत्येक डावात काही प्रमाणात मेण वापरण्याची मुभा दिली पाहिजे.'
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. यामुळे जगभरातील व्यवहार तसेच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा ठप्प आहेत. यात आयसीसीने पुन्हा क्रिकेट सुरू करण्याच्या उद्देशाने तयारी सुरू केली आहे. यात त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदी घातली आहे.