दुबई - सनरायजर्स हैदराबादला एक मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे स्नायू दुखावले असून तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. दरम्यान, भुवीच्या यंदा होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाण्याच्या आशाही धूसर होण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वर कुमारला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. तो डावाच्या १९ व्या षटकात पहिला चेंडू टाकल्यानंतर लंगडत मैदानाबाहेर गेला होता. सामना संपल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. यात भुवीच्या जांघेतील स्नायू दुखावल्याचे दिसून आले. यामुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही.
दरम्यान, सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात भुवनेश्वर कुमारची कामगिरी समाधानकारक होती. भुवीने सातपेक्षा कमीच्या सरासरीने धावा दिल्या, पण त्याला चार सामन्यात केवळ तीन गडी बाद करता आले होते. भुवीच्या दुखापतीमुळे सनरायजर्संना मोठा धक्का बसू शकतो. कारण संघाच्या अनुभवहीन गोलंदाजीमुळे डेथ ओव्हर्समध्ये त्यांना चांगल्या गोलंदाजाची नक्कीच उणीव भासणार आहे.
भुवी मागील वर्षभरापासून दुखापतींसोबत संघर्ष करत आहे आणि स्नायूच्या दुखापतींमुळे तो बराच काळ संघाबाहेर राहिला आहे. त्याने आयपीएलदरम्यान पुनरागमन केले होते. तो यंदा सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकला होता. भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीसोबत युएईमध्ये आहेत. त्यामुळे भुवी देखील यूएईमध्येच थांबण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - RCB VS DC : दिल्लीची गुणतालिकेत भरारी, मुंबई दुसऱ्या स्थानावर