लंडन - इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे वडील गेरार्ड स्टोक्स यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही माहिती दिली.या कारणामुळे स्टोक्स मंगळवारच्या सराव सत्रात उपस्थित राहू शकला नाही.
हेही वाचा - क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धोनीला केलं कर्णधार, निवडला दशकातील बेस्ट संघ
गेरार्ड हे एका गंभीर आजाराने ग्रासले आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'बेन स्टोक्सचे वडील गेरार्ड यांना सोमवारी जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आपल्या वडिलांसोबत असल्याने बेन सुपरस्पोर्ट पार्क येथील सराव सत्रात भाग घेणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड बेन आणि त्याच्या कुटुंबासमवेत आहे आणि त्यांनी बेन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे माध्यम व जनतेला आव्हान केले आहे', असे ईसीबीने आपल्या निवेदनात म्हटले.
मांध्यमांच्या वृत्तानुसार, स्टोक्सचे वडील कुटुंबासमवेत ख्रिसमस साजरा करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले होते. आफ्रिकेविरूद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ आफ्रिकेत दाखल झाला आहे.