लंडन - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळला जाणारा पहिला आणि ऐतिहासिक कसोटी सामना दिल्लीच्या डॉ. विकास कुमार यांच्यासाठी विशेष ठरला. विकास हे मागील वर्षी आपल्या वैद्यकीय प्रशिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. सध्या ते एनएचएस हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लढा देत आहेत.
साऊथम्प्टनच्या एजेस बाउल मैदानावरील सामन्यापूर्वी बेन स्टोक्सने संघाच्या सराव सत्रात भाग घेतला होता. तेव्हा त्याच्या जर्सीवर डॉ. विकास कुमार यांचे नाव होते. विकास हे डार्लिंग्टन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अॅनास्थेटिक आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ आहेत. स्टोक्सने ही जर्सी परिधान करत विकास यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम केला. विंडीजविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी स्टोक्स इंग्लंड संघाचा कर्णधार आहे.
डॉ. विकास कुमार म्हणाले, ''माझ्यासाठी ही फार कठीण वेळ आहे. माझे पालक दिल्लीत आहेत. आमचे सहकारी आणि एक हौशी क्रिकेट क्लब 'गिली बॉईज' यांच्याशिवाय आमच्याकडे जास्त सामाजिक पाठबळ नाही.'' हा हौशी क्रिकेट क्लब भारतीयांनी सुरू केला असून विकास हे त्याचे सदस्यही आहेत.
ते म्हणाले, ''पण कौटुंबीक आधार वेगळा असतो. मी क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये काम करत आहे, जिथे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. हा माझ्या नोकरीचा एक भाग आहे. मला रुग्णाच्या आत श्वासोच्छवास पाईप बसवावा लागतो. अशा रुग्णांकडून कोरोना पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे माझ्यासाठी खूप धोका असतो. मी 60 ते 70 वर्षांच्या लोकांना तिथे रात्रंदिवस काम करताना पाहिले, म्हणून हे लोकं आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यामुळे मी कधी मरणाचा विचार नाही केला.''
''मी कर्तव्यानंतर दररोज घरी जातो आणि घरातील खोलीत मी स्वत: ला बंदिस्त करतो. परंतु, माझ्या मुलास अद्याप सोशल डिस्टन्सिंगची जाण नाही. त्याने खोली जवळ येऊन दार ठोठावले की त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी फार कठीण होते. तो नुकताच बोलायला शिकला आहे.''
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.