लंडन - रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळले गेले तर तर स्पर्धा कमी होणार नाही, असा विश्वास इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने व्यक्त केला आहे. एका रेडिओ लाईव्ह कार्यक्रमावेळी स्टोक्सने आपले मत दिले.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आली तर तिचा प्रभाव कमी होईल का?, असा प्रश्न स्टोक्सला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, "मला असे वाटत नाही. फक्त विचार करा, आम्ही आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहोत, तीन सिंह आपल्या छातीवर आहेत आणि आपण सामना जिंकू या आवेशाने आम्ही सामना खेळणार आहोत."
स्टोक्स पुढे म्हणाला, "मग, आपल्या समोर कोणी नसेल किंवा आपल्यासमोर खूप गर्दी असेल तरीही स्पर्धा कमी होणार नाही असे मला वाटते. क्रिकेट आणि लोकांना टीव्हीवर आणण्यासाठी आम्ही काहीही करू. त्यासाठी जर प्रेक्षकांशिवाय खेळावे लागले तर आम्ही खेळू." तथापि, या प्रक्रियेसला वेळ लागेल, असे स्टोक्सने कबूल केले.
खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही स्टोक्स म्हणाला. "पुढे काय होईल याची आम्हाला खात्री नाही. या क्षणी प्रत्येकजण सुरक्षेचा विचार करीत आहे. लोकांचे समाधान होईपर्यंत खेळाडू आणि ईसीबी लोकांना काहीही सांगणार नाहीत," असे त्याने सांगितले आहे.