नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, छातीत दुखू लागल्यामुळे गांगुलीला पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आले आहे. याआधी २ जानेवारीला गांगुलीला जिममध्ये व्यायाम करत असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तत्काळ कोलकातामधील वूडलँड या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
हेही वाचा - जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना स्थगित
उपचारासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती -
गांगुलीवर उपचार करण्यासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्याच्या प्रकृतीविषयी कार्डिअॅक सर्जन देवी शेट्टी, रमाकांत पांडा, कार्डिओलॉजिस्ट सॅम्युल मॅथ्युज, सामीन शर्मा, कार्डिओलॉजिस्ट अश्विन मेहता यांची मते झूम अॅप तसेच फोनच्या माध्यमातून जाणून घेण्यात आली.
यशस्वी भारतीय कर्णधार -
गांगुली २००० ते २००४ या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. कसोटी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने १३१ धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा १०वा फलंदाज ठरला.
१९९२ मध्ये पदार्पण -
गांगुलीने १९९२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेर राहिला. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.