मुंबई - दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाविरुध्द मालिका खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी, भारतीय संघाला आफ्रिका दौऱ्यासाठी निमंत्रण दिले. मात्र, हा दौरा कठीण असल्याचे मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
अधिकारी म्हणाले, "हे शक्य नाही. फिटनेस प्रशिक्षण आणि फलंदाजी-गोलंदाजीचे प्रशिक्षण करणे या वेगळ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे असे खेळाडू आहेत ज्यांनी मागील 50-60 दिवसांत चेंडूला आणि बॅटला स्पर्शही केलेला नाही. मग तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्याची अपेक्षा कशी करू शकता? आम्ही प्रशिक्षकांसोबत तंदुरुस्ती राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव आवश्यक असेल."
"आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, बीसीसीआय आपले सर्व द्विपक्षीय करार पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा दोन्ही देशांसाठी योग्य परिस्थिती असेल तेव्हा हे शक्य होईल. परंतु ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत क्रिकेट मालिका खूप कठीण आहे," असे अधिकारी म्हणाले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला होता. उभय संघातील धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे उर्वरित दोन सामने बीसीसीआयने रद्द केले. त्यामुळे एकही सामना न खेळता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतामधून माघारी परतला होता.