मुंबई - जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा आणि पुनम यादव या ४ खेळाडूंच्या नावांची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शनिवारी करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी बीसीसीआयने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे या ४ खेळाडूंच्या नावांची खास शिफारस केली आहे.
बुमराह हा भारताच्या वेगवान गोलंदाजीचा महत्वाचा भाग असुन गेल्या काही काळात त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याच्यासोबतच मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनीही दमदार गोलंदाजी करत भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. तसेच या तिनही खेळाडूंचा आगामी वनडे विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज पूनम यादवने आतापर्यंत 41 वन डे सामने खेळताना 63 विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ती भारतीय संघाची महत्वाची गोलंदाज होती.