नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे मत 3-2 असे विभागले गेले आहे. या मतांमध्ये बहुतेकांना ही लीग भारतातच खेळवण्यात यावी असे वाटत असून गरज भासल्यास ही लीग भारताबाहेर आयोजित करावी असेही काहींनी मत दिले.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले, ''आयपीएल आयोजित करण्याबाबत सर्वसाधारण विचार म्हणजे लीग भारतात झाली पाहिजे. परंतु अशीही काही माणसे आहेत ज्यांना भारताबाहेर लीग खेळवावी असे वाटते.''
अधिकारी म्हणाले, “कोण काय बोलले हे न पाहता सर्वसाधारण मत असे आहे की, भारतात लीग असणे हे देशातील लोकांसाठी सकारात्मकतेचे प्रतीक आहे. शिवाय, आम्हालाही परदेशात जाण्याची गरज नसल्यामुळे एकप्रकारे मदत होईल. इथल्या काही लोकांचा असा विश्वास आहे की स्पर्धा प्रत्येक परिस्थितीत आयोजित केली जावी. या लीगचे आयोजन हा चर्चेचा विषय आहे. त्याशिवाय खेळाडूंची सुरक्षा आणि सर्व लोकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे."
एका फ्रेंचायझी अधिकाऱ्याने सांगितले, की देशात स्पर्धा आयोजित करण्याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. ते म्हणाले, "बघा, जर ही लीग देशात आयोजित केली गेली तर केवळ जगाला एक सकारात्मक संदेश दिला जाईल असे नाही, तर सर्व गोष्टी पूर्ववत आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत असा विश्वाय भारतीयांना देता येईल. जर तुम्ही बाहेर गेलात तर खर्चही होईल. त्यामुळे बहुतेक संघ भारताला प्राधान्य देतील असा माझा विश्वास आहे. ”
बीसीसीआयने कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब केले आहे.