मुंबई - जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या स्टार क्रिकेटपटूंना गेल्या 10 महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. बोर्डाच्या मध्यवर्ती कराराशी संबंधित 27 खेळाडू गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तिमाही हप्ता आणि सामना शुल्काची प्रतीक्षा करीत आहेत.
बीसीसीआय खेळाडूंना त्यांच्या केंद्रीय कराराच्या श्रेणीनुसार वर्षातून चार वेळा (दर तिमाही) मानधन देते. ऑक्टोबरमध्ये खेळाडूंना अखेरची रक्कम मिळाली. याशिवाय खेळाडूंची सामना रक्कमही देणे बाकी आहे. डिसेंबर 2019 पासून टीम इंडिया 2 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. मात्र, मंडळाने अद्याप खेळाडूंचे मानधन दिलेले नाही.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मंडळाने खेळाडूंना जे पैसे द्यायचे आहेत त्याची रक्कम आता 99 कोटींवर आली आहे. हे पैसे श्रेणीनुसार, खेळाडूंमध्ये वितरित करावे लागतात. ए+ श्रेणीमध्ये असलेले कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना दरवर्षी 7 कोटी रुपये मिळतात. त्याचप्रमाणे ए, बी आणि सी श्रेणींना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी मिळतात. त्याचप्रमाणे जर सामना शुल्काबद्दल सांगायचे झाले, तर हे मानधन कसोटीत 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि टी-20 साठी प्रत्येक सामन्यात 3 लाख इतकी निश्चित आहे.
केंद्रीय कराराशी संबंधित 8 खेळाडूंनी पुष्टी केली, की मंडळाने त्यांना मागील 10 महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली नाही, असा दावाही या अहवालात केला गेला आहे.