कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्षणांचा बर्याच वेळा उल्लेख केला आहे. परंतु आता त्याने कारकिर्दीतील सर्वात मोठ्या अपयशाबद्दल भाष्य केले आहे. 2005मध्ये गांगुलीकडून भारतीय संघाचे नेतृत्त्व काढून घेण्यात आले. शिवाय, त्याला संघातून वगळण्यात आले होते.
बंगालमधील एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना गांगुलीने या घटनेला अन्यायकारक म्हटले आहे. तो म्हणाला, ''माझ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे अपयश होते. हा संपूर्ण अन्याय होता. मला माहित होते, की आम्हाला नेहमीच न्याय मिळणार नाही. ज्यावेळी झिम्बाब्वेमध्ये आम्ही जिंकलो होतो, मी त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार होतो. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा माझ्याकडून कर्णधारपद हिसकावले गेले.''
तो पुढे म्हणाला, "मी भारतासाठी 2007चा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यापूर्वी आम्ही फायनलमध्ये हरलो होतो. स्वप्न पाहण्याचेही माझ्याकडे एक कारण होते. संघ माझ्या कर्णधारपदाखाली पाच वर्षे चांगला खेळला. त्यानंतर अचानक एकदिवसीय संघातून आणि त्यानंतर मला कसोटी संघातूनही वगळण्यात आले."
गांगुली म्हणाला, ''मी फक्त ग्रेग चॅपेल यांना दोष देणार नाही. त्यांनी हे सर्व सुरू केल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. त्यांनी अचानक माझ्याविरूद्ध बोर्डाला माझ्याविरुद्ध एक मेल लिहिला. हे असे होऊ शकते का? क्रिकेटचा संघ हा एक कुटुंबासारखा आहे. लोकांमध्ये बरेच मतभेद आहेत. तुम्ही प्रशिक्षक होता. कसे खेळायचे याबद्दल तुम्ही माझ्याशी बोलू शकला असता. नंतर मी खेळाडू म्हणून संघात परतल्यावर त्यांनी मला सर्व सांगितले, जे यापूर्वी ते बोलू शकले असते.''
गांगुली पुढे म्हणाला, "इतर लोकही निर्दोष नाहीत. परदेशी प्रशिक्षकाच्या निवडीबद्दल मी बोलू शकत नव्हतो. मला समजले की संपूर्ण यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय असे होऊ शकत नव्हते. मला वगळण्यात सर्वांचा हात होता. तथापि, मी त्या दबावाखाली मोडलो नाही. मी स्वतः वर विश्वास ठेवणे थांबवले नाही."
बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी 8 जुलैला आज आपला 48वा वाढदिवस साजरा केला. गांगुली 2000 ते 2004 या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो.