ब्रिस्टॉल - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या १६ व्या सामन्यात आज सलग २ पराभव झेलणाऱ्या बांगलादेशसमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव करणाऱ्या बांगलादेशला त्यानंतरच्या झालेल्या दोन्ही सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे.
श्रीलंकन संघानेही या स्पर्धेत ३ सामने खेळले आहेत. त्यातील एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला असून एक अनिर्णित राहीला आहे. श्रीलंकन संघाला हा सामना जिंकायचा असल्यास कर्णधार दिमुथ करुणारत्नेसह, कुशल परेरा, अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा यांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तर बांगलादेशी फलंदाजांना कमी धावसंख्येत रोखण्याचे आव्हान दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि सुरंगा लकमल यांच्यापुढे असेल.
यापूर्ण स्पर्धेत दमदार फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर बांगलादेशची मदार असेल. शाकिबने आतापर्यंत ३ सामने खेळताना ८६.६७ च्या सरासरीने २६० धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तर मुशफिकर रहीम, तमीम इक्बाल आणि मश्रफी मोर्तझा यांच्याकडून बांगलादेशला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. हा सामना ब्रिस्टॉलच्या काउंटी क्रिकेट मैदानावर दुपारी ३ वाजता सुरू होईल.
असे आहेत दोन्ही संघ
- श्रीलंका - दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल.
- बांगलादेश - मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.