सिडनी - ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ सहायक प्रशिक्षक अँड्र्यू मॅक्डोनाल्ड आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघासोबत नसतील. आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्ससोबतच्या वचनबद्धतेमुळे ते या दौऱ्याला अनुपस्थित असतील. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने शुक्रवारी ही माहिती दिली.
मॅक्डोनाल्ड यांनी गतवर्षी राजस्थान रॉयल्समध्ये पॅडी अपटन यांच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. ऑस्ट्रेलियाचा संघ ४ ते १६ सप्टेंबर दरम्यान तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंड दौर्यावर जाणार आहे.
आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोनाच्या साथीमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल. राजस्थान रॉयल्स संघ २० ऑगस्टला यूएईला रवाना होईल. आयपीएल संपल्यानंतर मॅक्डोनाल्ड ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील होतील.
अँड्र्यू मॅक्डोनाल्ड यांनी ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. आपल्या प्रशिक्षकपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी व्हिक्टोरिया संघाला शेफील्ड शील्डचे विजेतेपद मिळवून दिले होते. मॅक्डोनाल्ड हे २००९ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळले आहेत. त्यानंतर २०१२-१३ या वर्षासाठी ते बंगळुरू संघाच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक होते.