नॉटिंगहॅम - विश्वकरंडकाच्या १० व्या सामन्यात गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघात स्टार फलंदाजांचा भरणा असल्याने या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेले दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे कांगारुंची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, नाथन लॉयन अशा स्टार गोलंदाजांचा ताफा असल्याने स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जात आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघात ख्रिस गेल, शाय होप, आंद्रे रसेल आणि शिमरॉन हेटमायर यांसारखे फलंदाज आहेत जे कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता ठेवतात. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत पाकच्या संपूर्ण संघाला अवघ्या १०५ धावांमध्ये गारद केले होते.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघानी विश्वकरंडक स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकून थाटात सुरुवात केलीय. त्यामुळे हा सामना जिंकून गुणतालिकेत कोण आघाडी घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. हा सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.
असे आहेत दोन्ही संघ
- ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.
- वेस्ट इंडिज - जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, आंद्रे रसल, शेल्डन कॉटरेल, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच, निकोलस पूरन, ऍशले नर्स, फॅबियन ऍलन, शिमरॉन हेटमायर, शाय होप, ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, इव्हिन लुईस.