लंडन - आयसीसी वनडे विश्वकरंडकात गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला ४८ धावांनी पराभूत केले. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अक्षरक्षा धावांचा पाऊस पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदांजी करताना निर्धारीत 50 षटकात 5 बाद 381 धावा केल्या होत्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघानेही दमदार फलंदाजी करत 333 धावा केल्या आणि विश्वकरंडकात एक नवा इतिहास रचला.
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशने मिळून या सामन्यात एकूण 714 धावा केल्या. विश्वकरंडकात एका सामन्यात दोन्ही संघांनी मिळून केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तसेच विश्वकरंडकाच्या इतिहासात एका सामन्यात 700 पेक्षा जास्त धावा होण्याची ही पहिलीच वेळ ठरलीय.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वार्नरने बांगलादेशच्या गोलंदाजीचे पिसे काढत 147 चेंडूत 166 धावा केल्या. तर बांगलादेशसाठी मुश्फिकूर रहिमने १०२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. मात्र, रहिमची ही शतकी खेळी बांगलादेशला पराभवापासून वाचवू शकली नाही.