लंडन - ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड संघात प्रतिष्ठित अॅशेस मालिकेचा पहिला कसोटी सामन्याचा थरार बर्मिगहॅमच्या मैदानावर रंगला आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणात शिक्षा पूर्ण करुन पुन्हा कसोटीच्या मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू डेव्हिड वार्नर, कॅमरुन बेनक्रॉफ्ट आणि स्टीव स्मिथची प्रेक्षकांनी हुर्रे उडवली.
पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि कॅमरुन बेनक्रॉफ्ट स्वस्तात बाद झाले. यानंतर उस्मान ख्वाजाही पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात आला. दरम्यान, या सामन्यात चेंडूला छेडछाड केल्या प्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेले डेव्हिड वार्नर, कॅमरुन बेनक्रॉफ्ट यांची प्रेक्षकांनी खिल्ली उडवत त्यांना भर मैदानात सॅन्डपेपर दाखवले.
![ashes 2019 england cricket fans shows mask of crying steve smith at stadium](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4011864_kkk--2.jpg)
काही प्रेक्षकांनी तर स्टिव स्मिथला चिडवण्यासाठी स्मिथचा मुखवटा परिधान केला. या मुखवट्यावर स्मिथ रडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मालिकेच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू मालिकेत कसा खेळ करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
![ashes 2019 england cricket fans shows mask of crying steve smith at stadium](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4011864_kkk--1.jpg)
चेंडूशी छेडछाड केल्याने, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, डेव्हिड वार्नर, कॅमरुन बेनक्रॉफ्ट आणि स्टिव स्मिथ यांच्यावर १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. बंदीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिघांनी परत कसोटी संघात जागा मिळवली आहे.