नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने महेंद्रसिंह धोनीला आपल्या आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. आयपीएलमध्ये आणि क्रिकेटविश्वात धोनी हा महान कर्णधार म्हणून ओळखला जातो.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे तीन वेळा जेतेपद पटकावले आहे. सीएसके संघ नेहमी आयपीएलच्या गुणतक्त्यात आघाडीवर राहिला आहे. आकाशने आपल्या यूट्यूब चॅनेल आकाशवाणीवर या संघाची घोषणा केली.
आकाशने सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरची निवड केली. तर, तिसऱ्या क्रमांकासाठी आकाशने विराट कोहलीची निवड केली आहे. मधल्या फळीत आकाशने सुरेश रैना, अब्राहम डीव्हिलियर्स आणि धोनीला स्थान दिले आहे. तर, हरभजन सिंग आणि सुनील नरेनसारखे दिग्गज फिरकीपटू या संघात आहेत.
वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह यांची संघात निवड झाली आहे. तर, अतिरिक्त खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि आंद्रे रसेलची आकाशने निवड केली आहे.
आकाश चोप्राने निवडलेला आयपीएल संघ -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अब्राहम डीव्हिलियर्स, हरभजन सिंग, सुनील नरेन, भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह.