केपटाऊन - बेन स्टोक्सने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या ३ विकेटमुळे इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. केपटाऊनच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने आफ्रिकेवर १८९ धावांनी मात केली. या विजयासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे.
इंग्लंडच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेने २ बाद १२६ अशी मजली मारली होती. अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात केशव महाराज (२), फाफ डु प्लेसी (१९), ज्यु. पीटर मालन (८४) हे झटपट बाद झाले. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ५ बाद १७१ अशी झाली.
तेव्हा क्विंटन डी-कॉक आणि रासी वेन डर दुसान यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. दोघांनी तब्बल ४४ षटके खेळून काढली. स्टुअर्ट ब्रॉडने डी कॉकला तर ज्यो डेनलीने रासी व्हॅन दुसानला बाद केले. त्यानंतर दिवसाचा खेळ संपण्यासाठी ८ षटके शिल्लक असताना बेन स्टोक्सने शेवटचे ३ गडी बाद करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २६९ धावा केल्या होत्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला २२३ धावांत गुंडाळत इंग्लंडने ४६ धावांची आघाडी घेतली होती. दुस-या डावात इंग्लंडने डोम सिबलीच्या नाबाद १३३ आणि बेन स्टोक्सच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर चौथ्या दिवशी दुसरा डाव ८ बाद ३९१ वर घोषित केला. पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर ४३८ धावांचे आव्हान ठेवले होते. बेन स्टोक्स सामनावीर ठरला.