नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये पात्र ठरण्याचा विश्वास असलेल्या आठ बॅडमिंटनपटूंच्या राष्ट्रीय शिबिराची सुरुवात आज शुक्रवारपासून हैदराबादच्या पुलेला गोपीचंद अकादमी येथे होत आहे. तेलंगाणा राज्य सरकारने १ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) हा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकारने ५ ऑगस्टपासून क्रीडा उपक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधुव्यतिरिक्त सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, साई प्रणीत, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी या शिबिरामध्ये भाग घेतील.
याप्रकरणी राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुल्ला गोपीचंद म्हणाले, "दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर आमचे सर्वोत्तम खेळाडू कोर्टवर परत आल्याने मला आनंद झाला आहे. आम्ही सर्व सुरक्षित वातावरणात प्रशिक्षणासाठी सज्ज आहोत." खेळाडूंना संपूर्ण संरक्षण प्रदान करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे अनुसरण करण्यासाठी, अकादमीला रंगानुसार विभागले गेले आहे, जेथे केवळ खेळाडू आणि प्रशिक्षक येऊ शकतील. सहायक कर्मचारी आणि प्रशासकांसाठी स्वतंत्र झोन तयार केले गेले आहेत आणि या लोकांना कोर्टवर जाण्यास मनाई आहे.
आरोग्य मंत्रालय आणि प्राधिकरणाने ठरवलेल्या एसओपीच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन हे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेतली जाईल.