क्वॉलालंपूर - मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर, काही तासांमध्ये जगातील अव्वल बॅडमिंटनपटू केंटो मोमोटा याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मलेशियामध्ये झालेल्या या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाला. तर मोमोटासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोमोटा सामना झाल्यानंतर आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत खासगी टॅक्सीने हॉटेलमध्ये परतत होता, तेव्हा त्या गाडीला एका ट्रकने जोरदार टक्कर दिली आणि गाडीने लगेच पेट घेतला. यात गाडीचा चालक जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
अपघातात मोमोटासह ३ जण जखमी झाले आहेत. यात ब्रिटीश बॅटमिंटन तांत्रिक अधिकारी फोस्टर विलियम थॉमस, जपानचे फिजीओथेरापिस्ट हिरायमा यू आणि सहाय्यक प्रशिक्षक मोरीमोटो आर्किफुकी यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच मुख्य ध्येय - सिंधू
हेही वाचा - बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न