जकार्ता - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आज (गुरूवारी) दुसऱ्या फेरीत सिंधूचा जपानच्या सयाका ताकाहाशी हिने रोमांचक सामन्यात पराभव केला. सिंधूच्या पराभवाबरोबरच भारताचे इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
इंडोनेशिया स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत, जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूचा सामना १४ व्या स्थानी असलेल्या जपानच्या ताकाहाशीसोबत झाला. ताकाहाशीने १ तास ६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूचा १६-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला.
मागील वर्षाची विजेती ताकाहाशीने पहिल्या फेरीत भारताच्या सायना नेहवालला ९-२१, २१-१३, २१-५ अशी धूळ चारली होती. तर सिंधुने पहिल्या फेरीत जपानच्या आया ओहोरीला १४-२१, २१-१५, २१-११ असे पराभूत केले होते. सिंधूने हा सामना ५९ मिनिटांत जिंकला होता.
दरम्यान, इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत बुधवारी भारताच्या सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, सौरभ वर्मा, बी. साई प्रणीत, समीर वर्मा, पारुपल्ली कश्यप आणि एचएस प्रणॉय यांचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे.
हेही वाचा - 'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो'
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी