वुहान (चीन) - आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंना पराभवाचे मोठे धक्के बसले आहेत. भारताचे आघाडीचे बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधु, सायना नेहवाल आणि समीर वर्मा यांना क्वार्टर फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये सिंधुचा चीनच्या काई यानयानने 21-19, 21-9 असा पराभव केला. सायनाला जपानच्या अकाने यामागुचीने 21-13, 21-23, 21-16 असा पराभवाचा धक्का दिला. तर पुरुष ऐकरीत समीरला चीनच्या सी युकीकडून 21-10, 21-12 ने पराभव स्विकारावा लागला. या तीन्ही खेळाडूंच्या पराभवामुळे भारताला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला असून विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
या स्पर्धेत भारताचा दुसरा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांतला पहिल्याच फेरीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन हुस्तावितोच्या हाते 21-16, 22-20 असे पराभूत व्हावे लागले होते.