बंगळुरू - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. दीपिकाचे वडील आणि माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण यांच्यावर बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, प्रकाश पदुकोण यांच्यासह दीपिकाची आई उज्ज्वला आणि बहीण अनीषा हिला कोरोनाची लागण झाली आहे. प्रकाश पदुकोण यांना बंगळुरूमधील महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दीपिकाची आई आणि बहीण यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. प्रकाश पदुकोण यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. त्यांचा दुसरा डोस बाकी होता. त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली.
वडील, आई आणि बहिणीनंतर दीपिकाला देखील कोरोनाची लागण झाली. आज तिचा रिपोर्ट आला असून यात ती पॉझिटिव्ह आढळली आहे.
प्रकाश पदुकोण भारताचे बॅडमिंटनपटू
प्रकाश पदुकोण यांनी त्यांच्या बॅटमिंटन कारकीर्दीत प्रतिष्ठेच्या 'ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप'मध्ये विजेतेपद मिळवलं आहे. जागतिक क्रमवारीत ते अग्रस्थानीही राहिले आहेत. १९८० च्या दशकात त्यांनी भारताचे नाव बॅडमिंटन क्षेत्रात नावारुपाला आणलं. कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्यांनी भारतासाठी पदक जिंकलं आहे.
हेही वाचा - बॅडमिंटनपरी ज्वाला गुट्टाचे 'शुभमंगल सावधान', दोघांचाही दुसरा घरोबा
हेही वाचा - सिंधूच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळाला 'हा' जागतिक सन्मान