ओडेन्स (डेन्मार्क) - आजपासून सुरू होत असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारतीय पी. व्ही. सिंधूवर भिस्त असणार आहे. सिंधूसह महिलांमध्ये सायना नेहवालच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. पुरुष गटात साई प्रणीत पारूपल्ली कश्यप, किदांम्बी श्रीकांत, समीर वर्मा आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर भारतीयांच्या आशा आहेत.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. चीन ओपन आणि कोरिया ओपन स्पर्धेत ती अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या फेरीतून बाहेर पडली. मात्र, या स्पर्धेत सिंधू चांगली कामगिरी करेल, अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे. तिचा पहिला सामना इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्का टुनझुंगशी होणार आहे. तर सायनाला पहिल्या फेरीत जपानच्या सायका ताकाहाशी विरोधात खेळायचे आहे.
पुरुष गटात प्रणीतचा पहिला सामना चीनच्या लिन डॅनशी होणार आहे. तर कश्यप थायलंडच्या सिथिकोम थामसिनशी सलामी सामना खेळणार आहे. कश्यप सद्या फुल्ल फॉर्मात असून त्याने नुकतीच पार पडलेली कोरिया ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. दुखापतीतून सावरलेला श्रीकांतचा पहिला सामना डेन्मार्कच्याच आद्रेस एंटोनसेन यांच्याशी होणार आहे.
हेही वाचा - १८ वर्षीय लक्ष्य सेनची डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक
हेही वाचा - सायना नेहवालच्या मदतीला धावले विदेश मंत्रालय