कोरोनाची दुसरी लाट खूपच भयानक रीतीने लोकांना छळतेय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन म्हणजेच जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच शूट्सवर बंदी घालण्यात आली आहे. बऱ्याचशा मालिका महाराष्ट्राबाहेर नवीन भागांचे चित्रीकरण करीत होत्या जेणेकरून प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे झी मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ने तो पर्याय निवडला नव्हता आणि त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना बघायला मिळत नव्हते. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली असून ‘कारभारी लयभारी’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
![Karbhari Layabhari'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-karbhari-laybhari-returns-after-a-gap-mhc10001_18052021000245_1805f_1621276365_343.jpeg)
राजकारणावर बेतलेली ‘कारभारी लयभारी’ ही मालिका सुरु झाल्यावर सुरुवातीपासून तिने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेचं कथा तेजपाल वाघ यांची असून ‘देवमाणूस’ ह्या मालिकेचे संवादलेखक विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे. मालिकेतील ‘डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय, काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी...!’ हे गाणं विशेष गाजतंय.
![Karbhari Layabhari'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-karbhari-laybhari-returns-after-a-gap-mhc10001_18052021000245_1805f_1621276365_127.jpeg)
देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय, लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर आलेले निर्बंध, यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी, यामुळे ‘कारभारी लयभारी’ मालिकेने थोडा विराम घेतला होता. पण आता कारभारी लयभारी ची टीम दुप्पट जोमाने कामाला लागली असून मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.
![Karbhari Layabhari'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-karbhari-laybhari-returns-after-a-gap-mhc10001_18052021000245_1805f_1621276365_64.jpeg)
राजवीरचे वडील जसे त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात आणि राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम करावं यासाठी प्रियांका विशेष प्रयत्न करताना दिसणार आहे. काकी वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवले जातेय ते पाहून पियू ठरवते की या घरात त्या दोघांना त्यांचा मान मिऴवून द्यायचा. तिला हे जमेल का किंवा सक्रिय राजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना अशा प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या नवीन भागांतूनच मिळेल.
“कारभारी लयभारी” ही मालिका झी मराठीवर प्रसारित होते.
हेही वाचा -ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास होतेय वारंवार गौरवांकित, देशालाबद्दल वाढवतेय अभिमान!