सध्या जेव्हा संपूर्ण जग भारतीय संस्कृतीकडे आदराने बघत असताना आधुनिक काळात अनेक पाश्चिमात्य ‘संस्कार’ भारतीयांनी उचलले आहेत. विदेशी हेच चांगलं यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पाश्चिमात्य संस्कृतीतील काहीही चालतं. आता हेच बघाना. स्त्री-पुरुष नात्याचा एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे 'पॉलीअमॉरी'. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु 'पॉलीअमॉरी' संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. याच 'पॉलीअमॉरी' संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
काळ बदलतो तसे समाजाचे आचारविचार बदलतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीसोबत सामाजिक नियमात बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला. भारतीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारतात द्रौपदीला पाच नवरे होते. त्यामुळे पॉलीअमॉरी संकल्पना फार आधीपासूनच आपल्याकडे प्रचलित आहे. सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय आहे.

मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळे आशय-विषय निवडले जाणे हे नित्याचे झाले आहे. तीच प्रथा चालवत ‘पॉलीअमॉरी’ विषयावर आधारित वेब सिरीज येऊ घातलीय जिचं नाव आहे 'सोप्पं नसतं काही'. मयुरेश जोशी दिग्दर्शित 'सोप्पं नसतं काही' या वेबसिरीजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच 'सोप्पं नसतं काही' चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते किंवा आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील.

'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित होणाऱ्या मया वेबसिरीजबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''आपले मराठी प्रेक्षक खूपच चोखंदळ आहेत. नवनवीन विषयांचा ते नेहमीच स्वीकार करतात. त्यामुळे पॉलीअमॉरी हा एक वेगळा विषयीही ते नक्कीच स्वीकारतील. या वेबसिरीजचा विषय आजपर्यंत मराठीत कधीही हाताळण्यात आलेला नाही. मुळात आपली कला, संस्कृती, साहित्य यांना आधुनिकतेची जोड देत ती सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. ‘सोप्पं नसतं काही' हा त्याचाच एक भाग आहे. या माध्यमातून जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, नाविन्यपूर्ण व दर्जेदार कंटेन्ट देणे, ही आमची जबाबदारी आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देतील याची खात्री आहे.''
येत्या ३१ ऑगस्टपासून 'सोप्पं नसतं काही' ही वेबसिरीज प्रेक्षकांना अतिशय अल्पदरात पाहता येईल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर.