कोईम्बतूर - प्रसिध्द कादंबरीकार आणि व्यवसायाने अॅटो रिक्षा चालक असलेल्या एम. चंद्रकुमार यांनी एका महिलेला बाळंतपणात मदत केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. हे बाळंतपण सुरू असताना काहीजणांनी त्याचे व्हिडिओ बनवले, ते आता व्हायरल झाले आहेत.
एम. चंद्रकुमार यांना शहरातील मनीष थिएटर जवळ एक महिला प्रसुती वेदना देताना दिसली. त्यांनी तातडीने अॅम्ब्यूलन्सला कळवले. मात्र गाडी येईपर्यंत प्रसवकळा वाढल्या. अशावेळी त्यांनी न थांबता रसत्यावरच आडोसा करुन त्या महिलेचे यशस्वी बाळंतपण पार पाडले. यावेळी आजूबाजूला काही महिलाही जमा झाल्या होत्या. त्यांनी याचे मोबाईल कॅमेऱ्याने शूटींग केले.
अॅम्ब्यूलन्स येईपर्यंत बाळाचा जन्म झाला होता. त्याची नाळ चंद्रकुमार यांनी आपल्या चिमटीत घट्ट धरुन ठेवली व आलेल्या वैद्यकीय टीमला बाळ सुपुर्त केले. त्यानंतर आई व बाळ दोघांनाही रुग्णवाहिकेतून कोईम्बतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (सीएमसीएच) येथे दाखल करण्यात आले. 26 वर्षीय बाळाची आई ओडिशाची असून येथील शैक्षणिक संस्थेत काम करते.
या अनुभवाविषयी बोलताना चंद्रकुमार म्हणाले, ''माझ्या आयुष्यात मी काही डिलीव्हरी पाहिल्या आहेत. माझ्या रिक्षामध्ये १९९० मध्ये झालेली डिलीव्हरी ही माझ्या आयुष्यातली पहिली घटना होती. त्यावरच माझी अझगू ही कथा मी २०१३ मध्ये लिहिली. त्यामुळे ही घटना दिसताच मी लगेच तिच्या मदतीला धावून गेलो.''
कोईम्बतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (सीएमसीएच) चे डीन पी. कालिदास यांनी बाळाची आणि आईची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले आहे.
एम. चंद्रकुमार यांना अॅटो चंद्रन म्हणून ओळखले जाते. त्यांनी आजपर्यंत आठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या लॉकअप या कादंबरीवर आधारित विसारानाई हा तामिळ चित्रपट बनला होता. त्यांच्या महिला पीडीतेच्या विषयावरील कादंबरीवर ‘वेप्पा मात्रा वेल्लोलियाल’ हा चित्रपट बनत आहे.