कोविड परिस्थिती आटोक्यात आली आहे असे वाटत असल्यामुळे टेलिव्हिजन वाहिन्या नवनवीन मालिका घेऊन येत आहेत. मराठी प्रेक्षक हा खूपच श्रद्धाळू आहे त्यामुळेच धार्मिक मालिकांना त्याचा भरपूर प्रतिसाद मिळतो. सोनी मराठी आता एक नवीनतम धार्मिक, पौराणिक मालिका घेऊन येतेय ज्यात नवनाथांच्या’ तोंडून ‘अलख निरंजन’ चा नाद पृथ्वीतलावर घुमणार आहे. या मालिकेचे नाव 'गाथा नवनाथांची' असून टेलिव्हिजन पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका येऊ घातलीय.
कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे.
महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हानात्मक असणार हे ओघाने आलंच.
'गाथा नवनाथांची' ही पौराणिक मालिका २१ जून २०२१ पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद! 25 वर्षीय तरूणाने कोरोनावर मात करत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा