गेल्या वर्षी संपूर्ण मानवजातीवर हल्ला केलेल्या कोरोनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले. आता या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून यावेळेस तर ही महामारी अजूनच अक्राळ विक्राळ रूप धारण करून आली आहे. या आजारांमुळे बाधितांना शारीरिक त्रास तर नक्कीच झाला परंतु त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनावरदेखील मोठे आघात झालेत. कोरोना सेंटर्समध्ये या जीवघेण्या विषाणूशी मुकाबला करताना मानसिक स्थैर्य गरजेचे असते. आणि ‘विनोद’ मानसिक संतुलन राखण्यात मदत करतो हे विज्ञानही मानतो.
कोरोना बाधितांना विलगीकरणात ठेण्यासाठी प्रत्येक राज्यात कोविड सेंटर उभारली गेली आहेत. अकोल्याचे मा. मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर (कोविड सेंटर) या करोना काळात रुग्णांच्या सेवेत तत्पर आहे. योग्य आणि गरजेच्या आरोग्य सेवा पुरवून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्याचा अकोल्याच्या या कोविड सेंटरचा उद्देश आहे. कोविड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी अकोल्याच्या या कोविड सेंटरने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक युक्ती शोधून काढली.
या कोविड सेंटरमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातंय. गेली दीड वर्षं करोन काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरते आहे. क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला मिळाले होते. कोविड सेंटरनी रुग्णांसाठी हास्यजत्रेचं प्रक्षेपण करणं, ही कलाकारांना आणि कार्यक्रमाला मिळालेली समाधानाची पोचपावती आहे.
या हास्यथेरपीसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या निर्मात्यांना आणि कलाकारांना संपूर्ण महाराष्ट्रातून आशीर्वाद मिळत आहे.
हेही वाचा - 'मनी हाईस्ट'मधील 'बेल्ला सिओ'च्या कडक मराठी व्हर्जनची चर्चा!