हल्लीच्या काळात कुठल्याही चित्रपट, मालिकेच्या प्रदर्शनापूर्वी ‘सस्पेन्स’ वाढविला जातो जेणेकरून त्याबद्दलची उत्सुकता वाढेल. झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीये' या आगामी थरारक मालिकेची चर्चा सर्वत्र चालू आहे. त्यातील ‘ती’ ची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली.
झी मराठीवर रात्री हा प्रोमो प्रसारित झाला आणि या प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे कि मुखवटा? ती परत आलीये असं विजय कदम आधीच्या प्रोमोमध्ये म्हणतात आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. ती कोण आहे याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे हे मला माहिती आहे पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल."
विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. आता १६ ऑगस्ट रोजीच ‘ती’आणि ‘ती’ ची कहाणी प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. ‘ती परत आलीये’ ही नवीन थरारक मालिका येत्या १६ ऑगस्ट पासून झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - सहदेवसोबत रॅपर बादशाहने प्रदर्शित केली "बचपन का प्यार" गाण्याची नवी आवृत्ती