‘माझा होशिल ना' मालिकेत अचानक एक ट्विस्ट आला असून आदित्य देसाई विरूद्ध आदित्य देसाई असा सामना बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी गेल्या काही भागात पाहिलं की जेडीने आदित्यवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यातून आदित्य जरी सुखरूप बचावला असला तरी आदित्यला आता त्याच्या भूतकाळाबद्दल आणि खऱ्या ओळखीबद्दल सांगायला हवं असं सगळ्या मामांना पटलंय आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत आदित्यला बसवण्यासाठी ब्रह्मेंनी एक प्रेस कॉन्फरन्स भरवली आहे, ज्यात आदित्य देसाईची साऱ्यांशी ओळख करून देणं हा त्यांचा हेतू आहे.
झी मराठीवरील 'माझा होशिल ना' ही लोकप्रिय मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. प्रेस कॉन्फरन्स बद्दल मात्र सई व आदित्यला काहीच कल्पना नाहिये आणि आयत्या वेळेस काहितरी घोळ होऊ शकतो ही भिती मनात घोळतेय. त्यातच या प्रेस कॉन्फरन्समध्ये नवाच आदित्य देसाई अवतीर्ण होतो आणि कंपनीवर हक्क सांगू लागतो. याने गोंधळात अजूनच भर पडते. नवा पेच तयार होतो. ज्यातून सुटणं कठीण आहे. आता या दोन आदित्य देसाई मधला खरा आदित्य देसाई कोण आणि हा तोतया नक्की कसा टपकलाय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आदित्यला सर्व सत्य कळेल का, आणि त्याला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत बसवण्यात मामा यशस्वी होतील का, हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. भावी काळात आदित्य विरुद्ध आदित्य असा सामना रंगू लागेल अशी चिन्हं आहेत.
'माझा होशिल ना' ही मालिका झी मराठीवर प्रसारित होते.
हेही वाचा - HBD Katrina : कॅटरिना कैफला आहेत सहा बहिणी आणि एक भाऊ