मराठी नाट्यव्यवसाय आणि वाद यांचं नात तस फार जुनं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठी व्यावसायिक नाट्यनिर्माता संघ या निर्मात्यांच्या संघटनेत झालेल्या वादाचं पर्यावसन अखेर निर्माता संघात फूट पडण्यात झाले आहे. या संघटनेतून बाहेर पडणाऱ्या नाट्य निर्मात्यांनी नाट्यधर्मी निर्माता संघ या नावाने नवीन संघटनेची बांधणी केली असून मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे या नवीन संघटनेचे अध्यक्ष असतील.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेले तीन महिन्यातून अधिक काळ नाट्य प्रयोग बंद आहेत. त्यामुळे रंगमंच कामगारांप्रमाणेच व्यावसायिक नाट्य निर्मात्यांनादेखील आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नाट्य निर्माता संघातील सदस्यांनी केली होती. त्या मागणीला बहुतांश निर्मात्यांनी दुजोरादेखील दिला होता. 44 सदस्यांच्या मदतीने संमत झालेल्या या प्रस्तावाला अनुसरून 28 अर्ज निर्माता संघाकडे मदत मागण्यासाठी आले. त्यातील सर्व सदस्यांना 50 हजार रुपये याप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या मदत वाटपावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. यातील काही निर्मात्यांनी मदतीसाठी अर्ज केला असला तरीही गेल्या 10 वर्षात एकही नाटकाची निर्मिती केलेली नाही मग त्यांना संघाने जमा केलेल्या पैशातून मदत का बरं द्यावी अशी भूमिका घेत 5 सदस्यांनी संघाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यात अजित भुरे, सुनील बर्वे, वैजयंती आपटे, प्रशांत दामले, श्रीपाद पद्माकर यांचा समावेश होता. यातील काही सदस्य नियामक मंडळावर कार्यरत असल्याने निर्माता संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येऊन पुन्हा निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र झाल्या प्रकाराने व्यथित झालेल्ल्या या सदस्यनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - समुद्रातील गनिमीकाव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांची जीवनगाथा येणार पडद्यावर
आता नव्याने स्थापन केलेल्या नाट्यधर्मी निर्माता संघात अध्यक्षपदी अमेय खोपकर, उपाध्यक्ष पदी महेश मांजरेकर, कार्यवाह पदी दिलीप जाधव, सह कार्यवाह पदी श्रीपाद पद्माकर, खजिनदार पदी चंद्रकांत लोकरे, प्रवक्ते पदी अनंत पणशीकर, कार्यकारी सदस्य पदी सुनील बर्वे, नंदू कदम, सन्माननीय सल्लागार पदी लता नार्वेकर प्रशांत दामले यांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या नवीन संघटनेची औपचारिक घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. अखेर कोविड मदतीच्या वाटपावरून संघटनेत झालेल्या वादाचे पर्यवसान नाट्य निर्माता संघात फूट पडण्यास कारणीभूत ठरला आहे.