मुंबई - अमिताभच्या पावलावर पाऊल ठेऊन शाहरुखसुद्धा जाहिराती करू लागला. जाहिरातविश्वाला जणू लॉटरीच लागली होती. त्यांच्याकडे भारतातील दोन सर्वात प्रसिद्ध सिनेकलाकार होते. त्यानंतर जवळपास सर्वच मोठमोठे स्टार्स अड्स करताना दिसू लागले आणि आता तर ज्या स्टारकडे जास्तीत जास्त जाहिराती असतील तो जनमानसात सर्वात लोकप्रिय असे समजले जाते.
हल्लीच्या काळात शाहरुख खान असंख्य जाहिराती करताना दिसतोय. आता तर त्याच्या नवीन जाहिरातीत एक नव्हे तर दोन-दोन शाहरुख लोकांना बघायला मिळताहेत. त्यामुळे शाहरुख खानचे फॅन्स डबल खूष आहेत. एका कार केयर कंपनीच्या जाहिरातीत दोन विभिन्न शाहरुख बघायला मिळतात. या ऍड्स मधून ‘एसआरके’ ला आपल्या अभिनयाची व्याप्ती दर्शविण्याची संधी मिळाली आहे. ही ऍड अभिषेक वर्मन ने दिग्दर्शित केली असून तिला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
तब्बल दोन तपे बॉलिवूडचा अनभिषिक्त सम्राट राहिल्यानंतर नव्वदीच्या शेवटाला अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. त्यातच त्यांची निर्मिती संस्था असलेली ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एबीसीएल)ला प्रचंड आर्थिक नुकसान झाले. असे म्हटले जात की, बिग बी कर्जबाजारी झाला होता आणि त्याला पैशांची अत्यंत निकड होती. त्याचसुमारास त्याच्या सुपरस्टारडमचा फायदा घेण्याचे अॅड फिल्ममेकर्सनी ठरवले आणि त्याला जाहिरातीत काम करण्याची ऑफर दिली. पैसे भरपूर मिळणार होते परंतु बॉलिवूडच्या मानसिकतेला तो घाबरत होता. परंतु ‘सगळी सोंगं आणता येतात, परंतु पैशाचे नाही’ हे खरे ठरले आणि अमिताभ ने जाहिरात क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आगमनाने जवळपास सर्वच छोटे मोठे ब्रॅण्ड्स त्यांच्या प्रॉडक्टस साठी अमिताभ चा आग्रह धरू लागले आणि संपूर्ण सिनेसृष्टी चक्रावून गेली.
एक काळ असा होता की फिल्म स्टार्सनी जाहिरातीत काम करणे कमीपणाचे लेखले जाई. जाहिरात विश्वात वेगळे स्टार्स होते आणि त्यातील बरेच जण चित्रपटांतून काम करण्यास उत्सुक होते. कबीर बेदी, किमी काटकर, सुरेश ओबेरॉय, दीपक पराशर हे अभिनेते मॉडेलिंग वर्ल्ड मधून चित्रपटात आले होते. हल्लीच्या काळात मॉडेलिंग क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आलेल्या कलाकारांत जॉन अब्राहाम, कतरीना कैफ, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय यांची नावे घेता येतील. सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातही फिल्मस्टार्सने जाहिरातीत काम करणे म्हणजे त्याच्या करियरला उतरती कळा लागली, असे समजले जाई.