सांगली - नाट्य पंढरी सांगलीमध्ये आज रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते नटराज व विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन पार पडले.
नाट्य पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. याच भूमीतून रंगभूमीचा जन्म झाला. विष्णुदास भावे,गोविंद बल्लाळ देवल,बालगंधर्व ,मास्टर अविनाश अश्या अनेक दिग्गजांची जन्म व कर्मभूमी असणाऱ्या या सांगलीतून मराठी नाट्य सृष्टीला नवी दिशा मिळाली. 5 नोव्हेंबर 1843 मध्ये सांगली मध्ये विष्णुदास भावे यांनी "सीता स्वयंवर" हे पाहिले मराठी नाटक सादर केले होते आणि तेव्हापासून मराठी नाट्य क्षेत्रात 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन साजरा करण्याची परंपरा आहे. आज ही नटराज पूजन व नाटयसंगीत सादर करून ही परंपरा सांगलीकर नाट्य प्रेमी जोपासत आहेत.
आज विष्णुदास भावे नाट्य मंदिर याठिकाणी हा रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते नटराज व विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तर या रंगभूमी दिनी विष्णुदास भावे यांचे नावे पुरस्कार देण्याची प्रथा गेल्या 54 वर्षांपासून सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार हा अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी जाहीर झाला आहे. सांयकाळी हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.