मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. सध्या ते कॅन्सरमुक्त झाले आहेत. लवकरच ते भारतात परतणार आहेत. ऋषी कपूर अमेरिकेत जरी असले, तरीही भारतात सध्या पार पडलेल्या निवडणुकांवरही त्यांचे लक्ष होते. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा देशाची सत्ता मिळाली आहे. त्यांच्यावर सध्या सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऋषी कपूर यांनी देखील सोशल मीडियावरून नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी ३ गोष्टींची मागणीदेखील केली आहे.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'भाजप सरकार पुन्हा एकदा निवडुन आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यासोबत माझी एक मागणी देखील आहे, ती त्यांनी पूर्ण करावी, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. देशात मोफत शिक्षण, मोफत आरोग्य उपचार आणि मोफत निवृत्ती वेतन देण्यात यावे. या मागण्या पूर्ण करणे अवघड आहे. मात्र, जर मोदी सरकारने आत्तापासूनच यावर प्रयत्न केले, तर भविष्यात यावर अंमलबजावणी करणे सोपे जाईल', असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेत उपचार घेत असताना ऋषी कपूर यांनी या गोष्टींचा अभ्यास केला. अमेरिकेत शिक्षण, उपचार आणि निवृत्ती वेतन यांसारख्या बऱ्याच सुविधा नागरिकांना दिल्या जातात. या सुविधा भारतातही सुरू व्हाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.