लॉस एंजिलिस - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह असते. कधी कधी ती ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येत असते. मात्र, ती ट्रोलर्सला खूप चांगल्याप्रकारे हाताळताना दिसते.
शनिवारी (१० ऑगस्ट) लॉस एंजेलिस येथे एका कार्यक्रमात प्रियांकाला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थितांची गर्दी होती. यापैकी एका पाकिस्तानी महिलेने प्रियांकावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियांकाने तिचे पूर्ण बोलने ऐकून त्यावर शांतपणे सडेतोड उत्तर दिले.
प्रियांकाने काही दिवसांपूर्वी 'जय हिंद, भारतीय सेना!' अशा आशयाचे ट्विट केले होते. तिच्या याच ट्विटवर या पाकिस्तानी महिलेने प्रश्न उपस्थित केले होते. 'तू शांततेसाठी संयुक्त राष्ट्राची सद्भावना अँबेसडर आहेस. माझ्यासारखे इतरही पाकिस्तान मधले लोक तुला फॉलो करतात. तुला असं वाटत नाही का की तू पाकिस्तानी लोकांच्या मनात रोष पसरवत आहेस', असा प्रश्न यावेळी तिने प्रियांकाला विचारला.
तिचे बोलणे प्रियांकाने शांतपणे एकून घेतले. त्यानंतर तिने तिला यावर जे उत्तर दिले, ते एकूण उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. 'पाकिस्तानमध्ये माझे खूप मित्र आहेत. मी भारत देशाची आहे. मी कोणत्याची युद्धाचं समर्थन करत नाही. मात्र, मी देशभक्त आहे. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागते. मला असं वाटतं, की 'आपल्या सर्वांच्यामध्ये एक मधला रस्ता आहे. ज्यावर आपण सर्व चालत असतो. जसं की आता तू सुद्धा हेच करत आहेस. अशाप्रकारे ओरडू नकोस. आपण सर्व प्रेमाने एकत्रित येथे आलो आहोत'.
प्रियांकाचं हे उत्तर ऐकून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्याचा कडकडाट केला.
प्रियांकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.