पुणे - कलारसिकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापनदिन सोहळा दरवर्षी 26 जूनला साजरा केला जातो. मात्र कोरोनाचे संकट असल्याने यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यंदा बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन . त्यामुळे दरवर्षीची परंपरा मोडली जाऊ नये, या हेतूने यंदाच्या वर्षी साधेपणाने वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आणि सरकारच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. हा पडदा लवकरच उघडावा, यासाठी सर्वांनी नटराजाकडे साकडे घातले. महापौरांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू, तसेच कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी दिले.